पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय. सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही दिनांक 1 जुलै 2019 पर्यंत आहे.
या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत QS World University Ranking 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज विभागाच्या www.maharashtra.gov.in https://sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा. विहीत मुदतीत अर्ज व आवश्यक ते कागदपत्रासह आयुक्त, समाज कल्याण (शिक्षण शाखा), 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्यावर पाठवावा. या योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे , परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी , निर्वाह भत्ता , आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत . एकाच कुटूंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागु राहणार नाही. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन पुणे समाज कल्याण आयुक्त श्री. मिलींद शंभरकर यांनी केले आहे.