नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील, असं ठाम प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी, इस्राएल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम आशियाई शांती योजनाही त्यांनी जाहीर केली आहे.
या भागातल्या शांतीसाठी उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याबरोबर व्हाईट हाऊसमधे हा प्रस्ताव सादर करताना, ट्रम्प म्हणाले, की कोणत्याही इस्राएली किंवा पॅलेस्टीनी नागरिकाला आपलं घर गमवावं लागणार नाही.
आपल्या दृष्टीनं जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाची राजधानी राहील, असं ते म्हणाले. पूर्व जेरुसलेममधे पॅलेस्टाईनची राजधानी असेल, असा प्रस्ताव त्यांनी मांडला, तसंच इथं अमेरिकी दूतावास सुरु करण्याची घोषणाही केली.
नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या योजनेचं स्वागत करत इस्राएलसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगितलं. पॅलेस्टाईनचा कोणताही अधिकारी यावेळी उपस्थित नव्हता, योजना आधीच फुटली असून, त्यावेळीच पॅलेस्टाईननं ती फेटाळली आहे.
घोषणेनंतर हमास या पॅलेस्टीनी इस्लामी चळवळीनं हा प्रस्ताव ताबडतोब फेटाळला. ट्रम्प यांची शांती योजना उपयोगाची नसल्याचं पॅलिस्टाईनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी म्हटलं आहे.