Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

बीजिंग जागतिक महिला परिषदेच्या रौप्य महोत्सवानिमित कार्यशाळा

मुंबई : कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष देऊन महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच त्यांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण याकडे लक्ष दिले पाहिजे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे सांगितले.

विधानभवनात बीजिंग जागतिक महिला परिषदेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यशाळेचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात रचला गेला त्याच महाराष्ट्रात महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. महिला सक्षमीकरणासाठी सूक्ष्म संशोधन करण्याची गरज आहे. महिलांच्या विकासाबरोबरच महिलांच्या जबाबदाऱ्या, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, मानसन्मान याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. आज सर्वच क्षेत्रात महिला उत्तम कार्य करीत आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये न्यूयॉर्क येथे होणाऱ्या बिजिंग जागतिक महिला परिषदेमध्ये महाराष्ट्रातर्फे महिला सक्षमीकरणाचे चांगले सादरीकरण करावे, अशा सूचनाही श्री.पटोले यांनी दिल्या.

चीनमध्ये 25 वर्षांपूर्वी झालेल्या जागतिक महिला परिषदेमध्ये प्रामुख्याने उल्लेखलेल्या महिला व दारिद्र्य, त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण, आरोग्य, हिंसाचार, अर्थकारण, सत्ता व निर्णय प्रक्रियेतील सहभाग या महत्त्वाच्या विषयांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही श्री.पटोले यांनी केल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला विकासाचा आढावा घेत असताना महिलांना येणाऱ्या अडचणी याचीही नोंद घेणे आवश्यक आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे. त्यांना योग्य बाजारपेठ मिळत नाही. त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जागतिक महिला दिनानिमित्त येणाऱ्या अधिवेशनात महिला सक्षमीकरण या विषयावर विशेष प्रस्ताव दोन्ही सभागृहात मांडून चर्चा करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

1995 मध्ये चौथी जागतिक महिला परिषद बीजिंग येथे घेण्यात आली होती. या परिषदेमध्ये 189 देशांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर कृती करण्याचे मान्य केले होते. संयुक्त राष्ट्र संघाने महिला परिषदेचा रौप्य महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित स्वयंसेवी संस्थांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या गेल्या 25 वर्षातील कार्याचा आढावा, बीजिंग जाहीरनामा, आव्हाने, उद्दिष्टे गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे त्यांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे. समाजाच्या शाश्वत विकासामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करण्यात येईल. योजनांबद्दल काही अडचणी किंवा तक्रार असेल तर सूचना कराव्यात. महिलांनी सर्व पातळ्यांवर नेतृत्व करावे त्यांचा पूर्ण आणि परिणामकारक सहभाग आणि त्यांना समान संधी मिळतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

या कार्यशाळेस आमदार मनीषा कायंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा तसेच स्त्री आधार केंद्र, डेव्हलपमेंट स्पोर्ट टिम, ट्रान्सएशियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान राज्य शासनाच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे याबाबत सादरीकरण करण्यात आले.

Exit mobile version