Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या लोकल सेवेचे भाडे न वाढविण्याची मंत्री अस्लम शेख यांची मागणी

20 रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचे लोकार्पण 

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबईतील 20 स्थानकांवरील इंटरनेट वायफाय सुविधेचे अनावरण राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे झाले. यावेळी, आगामी अर्थसंकल्पात मुंबईतील प्रवासी वाहतुकीचे दर वाढवू नयेत, अशी मागणी श्री. शेख यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या पहिल्या ठाणे-वाशी-पनवेल वातानुकुलित लोकल सेवेचा प्रारंभ झाला. त्यावेळी श्री. शेख यांच्या हस्ते वायफाय सुविधेचे अनावरण करण्यात आले.

श्री. शेख म्हणाले, मध्य रेल्वेने मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी जास्तीत जास्त वातानुकुलित लोकल सुरू कराव्यात. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरील महिलांसाठीची शौचालये स्वच्छ व आधुनिक करण्यात यावीत. रेल्वे स्थानकांवर इंटरनेट वायफाय सुविधा सुरू केली आहे, त्याचप्रमाणे लोकल व प्रवासी रेल्वे मध्येही इंटरनेट वायफाय सुरू करावे.

हार्बर लाईन मालाडच्या पुढेपर्यंत वाढवावी – अस्लम शेख

मध्य रेल्वेची हार्बर लाईन ही गोरेगावपर्यंत सुरू आहे. ही लोकल मालाडच्या पुढेपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात लोकल सेवेची भाडेवाढ करू नये, अशी मागणी यापूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयास केली आहे. वातानुकुलित (एसी) लोकल सेवेचे भाडे पुढील काळात वाढवू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे-वाशी-पनवेल एसी लोकलचा शुभारंभ

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या पहिल्या ठाणे-वाशी-पनवेल वातानुकुलित लोकल सेवेचा प्रारंभ झाला. त्यावेळी श्री. अंगडी म्हणाले की, मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी जी काही गरज असेल, ती पूर्ण करण्यात येईल. मुंबईतील रेल्वे स्थानके स्वच्छ झाल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. रेल्वेच्या सुविधांसाठी आगामी दहा वर्षात 50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्योग, क्रीडा व युवक कल्याण, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते रेल्वे स्थानकावरील एलईडी इंडिकेटरचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार अरविंद सावंत, खासदार मनोज कोटक, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शरद गोयल आदी उपस्थित होते.

Exit mobile version