Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘इकोफ्रेंडली’ इंद्रायणी थडी जत्रेत धावतेय ‘ई-रिक्षा’ अन्‌ ‘ई-कार्गो’

वृद्ध नागरिकदिव्यांगमुलांसाठी मोफत सुविधा
ग्रीन शटल टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा पुढाकार

पिंपरी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत ‘ई-रिक्षा’ आणि ‘ई-कार्गो’ रिक्षा धावताना दिसत आहे. जत्रेसाठी येणारे वृद्ध नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना जत्रेत फिरता यावे. याकरिता ही सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रीन शटल टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीच्या पुढकाराने हा उपक्रम हाती घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी जत्रा भरविण्यात आली आहे. दि. २ फेब्रवारी २०२० पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी मोफत खुली राहणार आहे.

‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी थीम जत्रेसाठी ठेवली आहे. मात्र, मनोरंजन, खेळ, खाद्यपदार्थांची मेजवाणीसह पर्यावरण संवर्धनाबाबत प्रबोधन हा हेतू आहे. अविरत श्रमदान या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या पुढाकाराने जत्रेत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दत्तगड वृक्षलागवड असो अथवा इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प असो अशा विधायक उपक्रमात ‘अविरत’ उल्लेखनीय कार्य केले आहे.

ग्रीन शटल टेक्नॉलॉजी आणि अविरत श्रमदान यांच्या समन्वयातून ई-रिक्षांचे पीकअप ॲन्ड ड्रॉप पॉईंट ठरवण्यात आले आहेत. त्याद्वारे वृद्ध नागरिक, दिव्यांग, मुलांना स्टॉल्सला भेट देण्याची व्यवस्था केली आहे. जत्रेत सर्व ठिकाणी सुलभपणे पोहोचता यावे, याकरिता नियोजन करण्यात आले आहे. जत्रेत ‘ग्रीन शटल’चा स्टॉल उभारण्यात आला आहे. याठिकाणी ग्राहकांनी गाडीचे ‘बुकिंग’ केल्यास १० टक्के सवलत देण्यात आली आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, तब्बल १२ एकर परिसरात ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरवली जात आहे. जत्रेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देता यावा. यासाठी स्वतंत्र स्टॉल उभारला आहे. पर्यावरणपुरक वाहन ही काळाची गरज आहे. तसेच, ‘इंद्रायणी थडी’मध्ये कोणतेही प्रदूषण होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे. खासगी वाहने किंवा प्रदूषण होणारी उपकरणांना जत्रेत प्रतिबंध केला आहे.

जत्रेत टेक राईड ऑन ग्रीन साईड

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई-रिक्षा महत्त्वपूर्ण ठरत आहे. ३० पैसे प्रति किलोमीटर इतक्या अत्यल्प दरांत ही रिक्षा धावते. विशेष म्हणजे, ई-रिक्षाला मेंटनन्स काहीही नाही. ग्रीन शटल कंपनीच्या वतीने स्टॉलवर ई-रिक्षा, ई-कार्गो, फूड डिलिव्‍हरी व्‍हॅन प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी ‘टेक राईड ऑन ग्रीन साईड’ उपलब्ध केली जाणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या हेतून महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा भरवली जात आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात आमच्या कंपनीचा खारीचा वाटा असावा, या उद्देशाने आम्ही स्टॉल बूक केला आहे, अशी माहिती ग्रीन शटल टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक भूषण नावरकर यांनी दिली.

Exit mobile version