मुंबई : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक 600 दशलक्ष युरोचा (सुमारे 4800 कोटी रु.) वित्त पुरवठा करणार असून त्याच्या पहिला हप्ता 200 दशलक्ष युरो (सुमारे 1600 कोटी रु.) देण्यासंदर्भातील सामंजस्य करार पुणे मेट्रो आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या सहकार्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळणार असून भविष्यात इतरही प्रकल्पांना युरोपियन बँकेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व बँकेचे उपाध्यक्ष अँड्र्यू मॅकडोवेल यांनी करारावर स्वाक्षरी केली.
युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने पुणे मेट्रो प्रकल्पाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, बँकेने केलेल्या या सहकार्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळणार असून पुणे मेट्रो लवकर कार्यान्वित होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे पुणे व आसपासच्या परिसरातील वाहतुकीत प्रभावीपणे सुधारणा होईल व पुण्याच्या विकासास हातभार लागेल. पुणे मेट्रोची भौतिक प्रगती सध्या 37% तर आर्थिक प्रगती 29.53% झाली आहे. बँकेने दिलेल्या निधीचा वापर मेट्रोच्या भुयारी मार्ग, डेपो कामांसह इतर कामांसाठी केला जाईल.
युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणूक विकास आशादायक आहे. पुणे मेट्रोबरोबरच नाशिक मेट्रोसाठी व पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने पुणे, मुंबई मेट्रो बरोबरच राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईत 80 टक्के नागरिक हे सार्वजनिक वाहतुकीचा विशेषतः लोकलचा वापर करतात. त्यामुळे मेट्रो सारखे प्रकल्प सुरू केले असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या मेट्रो प्रकल्पामुळे पुणे, मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे.
यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, व्यवस्थापक एस शिवमाथंन, एस रामनाथ, युरोपियन युनियन चे राजदूत यूगो अस्तुत, मारिया शॉ बारगन, सुनीता लूकव्ह,युरोपियन बिझनेस अँड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक पौल जेनसेन आदी उपस्थित होते.
पुणे मेट्रो संक्षिप्त
- पुणे मेट्रो रेल प्रकल्प हा महत्वाकांक्षी नागरी वाहतूक सुविधा प्रकल्प
- महामेट्रोमार्फत ५०:५० टक्के केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.
- २३ जानेवारी, २०१७ रोजी प्रकल्पाचे काम सुरू
- हा प्रकल्प हा 32.5 कि.मी. मार्गिकेचा असून त्यामध्ये 30 स्टेशन आहेत.
- प्रकल्पाचा एकूण खर्च रू. ११,४२० कोटी इतका अपेक्षित आहे.
- केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सहाय्याने ए.एफ.डी. फ्रान्स व युरोपियन इनव्हेस्टमेंट बँकेमार्फत प्रकल्पास कर्ज पुरवठा