Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार या ग्रंथालयाला विशेष दर्जा देऊन संग्रहालयातील दुर्मिळ आणि नवी ग्रंथसंपदा संवर्धन आणि वाचकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी भेट देऊन पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईमधील पहिले मराठी ग्रंथ संग्रहालय शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देण्यासाठी योग्य तो निधी वितरित करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात 1956 पासूनचे चित्रा चे दिवाळी अंक आणि अतिशय दुर्मिळ पोथ्या व ग्रंथ या संग्रहालयात आहेत. यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्या ग्रंथांना लॅमिनेशनची गरज आहे त्याचे लॅमिनेशन करण्यात येईल. या संग्रहालयात मराठी संशोधन मंडळ आणि इतिहास संशोधन मंडळ कार्यरत आहे. यांच्या माध्यमातून नवीन साहित्य निर्मिती करण्यात येत आहेत, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, विश्वस्त प्रताप आसबे, अरविंद तांबोली, कार्याध्यक्ष बबन झरेकर, संचालक प्रदिप कर्णिक, कार्यवाह सुभाष नाईक आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version