दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक : गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही गावाच्या वैभवात भर घालणारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर ,उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, डॉ. सयाजीराव गायकवाड, सरपंच जयश्री कडाळे, उपसरपंच राजेंद्र ऊफाडे उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, इमारतीत बसणारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी वरखेडा ग्रामपंचायत परिसरातील येणाऱ्या सर्व गरजूंची व शेतकऱ्यांची सर्व कामे त्वरित करावी. वरखेडा परिसरातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘लिफ्ट’ सेवा असणारी वरखेडा ही पहिली ग्रामपंचायत ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीत तयार करण्यात आलेले व्यावसायिक गाळे गरजू लोकांना देऊन रोजगाराचे साधन उपलब्ध करुन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला होता. ग्राम व्यवस्थेकडे लक्ष देण्याचे तसेच ग्रामव्यवस्था बळकट करण्याचे त्यांनी सूचित केले होते. त्यांच्या या संदेशाला प्रत्यक्षात उतरवण्याचे काम महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यांनी समतेची कल्पना मांडली आणि ती अस्तित्वात आली. याच संकल्पनेवर सरकारची वाटचाल सुरू असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
श्री. पवार यांनी वरखेडा गावाच्या विकासासाठी 25-12 च्या निधीमधून 25 लाख रुपये देण्याचे यावेळी जाहीर केले. तसेच शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कर्जाच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न सुरु असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ , शालेय विद्यार्थी उपस्थित होते.