स्थापत्य 2020 टेक्निकल फेस्टिव्हलचे उद्घाटन
मुंबई : आयआयटी सारखेच वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूटने (व्हीजेटीआय) देखील चांगले विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी आज व्हीजेटीआय मध्ये शिकत आहेत ते नक्कीच भविष्यात प्रगती करतील. या विद्यार्थ्यांनी वैश्विक संधींचा विचार करावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
मुंबई येथील व्हीजेटीआय मधील स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या स्थापत्य 2020 या टेक्निकल फेस्टिव्हलचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्री.पाटील म्हणाले, या फेस्टिव्हलचे उद्घाटन करुन मला मोठा आनंद झाला आहे. टाऊन प्लॅनिंग, डिझायनिंग अशा विविध विषयांवर या फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत. जे नक्कीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतील. मी देखील याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. व्हीजेटीआय हे माझे महाविद्यालय आहे, मी इथेच शिक्षण घेतले आहे. ही वास्तू म्हणजे हेरिटेज बिल्डिंग आहे. त्याचीही काळजी आपण येत्या काळात घ्यायला हवी. अशा वास्तू टिकल्या पाहिजेत. येणाऱ्या पिढीसाठी हे टिकवून ठेवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या भारतात मोठ्या बिल्डिंग किंवा वास्तू बनवत असताना त्याच्या डिझाइनसाठी आपल्याला बाहेरच्या कंपन्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. मुंबई वरळी सी लिंक बनवताना हेच झाले. आपल्या भारतातही चांगले डिझायनर, आर्किटेक्ट आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मी ज्या क्षेत्रातून आलो, त्या क्षेत्राचे खाते मला पहिल्यांदाच मिळाले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना जे काही अनुभव घेतले त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी करणार असल्याचे ते म्हणाले.
सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी टाऊन प्लॅनिंगचा अभ्यास करावा. शहरे वसवताना पुढील 200 वर्षांचे नियोजन करावे. मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होते. मात्र नवी मुंबईत जास्त त्रास जाणवत नाही. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची कल्पना जेव्हा आम्हाला सुचली, तेव्हा शिवस्मारकाच्या डिझाईनसाठी आम्ही जे जे स्कूल ऑफ आर्टच्या प्राध्यापकांची नेमणूक केली. छत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभा करणार होतो. अतिशय देखणे डिझाइन त्यांनी तयार केले होते, मात्र काही कारणाने नंतर त्यात बदल झाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रतिकृतींच्या प्रदर्शनास मंत्री श्री. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनचे पदाधिकारी, व्हीजेटीआयच्या सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. एस. म्हस्के, व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.