Site icon साप्ताहिक एकच ध्येय

परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते कुर्ला येथे पहिल्या प्रीपेड ‍रिक्षा स्टँडचे उद्घाटन

मुंबई : बाहेरुन मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांना महानगरात  विविध ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ वाहतुकीची सुविधा मिळतानाच त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रीपेड रिक्षा स्टँड सुरु करण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षितता देखील जपली जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच मुंबईमध्ये अन्य ठिकाणीदेखील अशा प्रकारे प्रीपेड रिक्षा स्टँड उभारण्यात येतील, असे  परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी सांगितले.

कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पहिल्या प्रिपेड रिक्षा स्टँडचे उद्‌घाटन परिवहन मंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. श्री. परब म्हणाले, बाहेरुन आलेल्या प्रवाशांना मुंबई परिसराची फारशी माहिती नसल्यामुळे त्यांना टॅक्सी व रिक्षा चालकांकडून त्रास होऊ नये, योग्य मार्गदर्शनाबरोबरच सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्रिपेड रिक्षा स्टँड महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

या स्टँडवर प्रवाशांना मिळालेली पावती ही त्यांच्या सुरक्षिततेची पावती असणार आहे. त्यामध्ये प्रवासी कुठून कुठे जाणार, किती वाजता जाणार, त्यांचा संपर्क क्रमांक आणि कोणत्या रिक्षाने प्रवास केला याची सर्व माहिती या प्रिपेड रिक्षा स्टँडवर आणि प्रवाशांकडे असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात खबरदारी घेण्यात आली आहे. रिक्षा चालकांनी प्रवाशांना आपुलकीची वागणूक देऊन त्यांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी यावेळी केले.

Exit mobile version