Site icon साप्ताहिक एकच ध्येय

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना घरी सोडले

मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या  सर्व 15 प्रवाशांचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. पुणे येथील पाचही जणांना आज घरी सोडण्यात आले.

मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 5 जणांपैकी 3 जणांना घरी सोडले आहे. उर्वरित दोघांना उद्यापर्यंत सोडण्यात येईल. पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती असलेल्या पाचही जणांना आज घरी सोडण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि नांदेड येथील भरती केलेल्यांनाही आज घरी सोडण्यात येत आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल  केलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाने काल राज्याला मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित व्यक्तींच्या चाचणीचा नमुना जर निगेटिव्ह आला तर त्याला डिस्चार्ज देऊन पुढील 14 दिवस त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरु असून आतापर्यंत 5 हजार 128 इतके प्रवासी तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी 4 प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. तर क्षेत्रीय सर्वेक्षणात आढळलेले आणखी 34 प्रवासी असे एकूण 38 प्रवासी बाधित भागातून आलेले आढळले आहेत. सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्यस्थितीबाबत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.

करोना संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 104 उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा, पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 020-26127394 असा आहे. करोना संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि आरोग्य शिक्षण विषयक साहित्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.

Exit mobile version