नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कमी खर्चातल्या उपग्रह प्रक्षेपकांची निर्मितीसाठी तयारी करत असल्याची घोषणा इस्रोचे उपसंचालक हरिदास टी.व्ही. यांनी केली आहे. ते काल थिरुअनंतपुरम इथं झालेल्या एज टू थाऊसंड ट्वेंटी या अंतराळविषयक परिषदेत बोलत होते.
अशा प्रकारच्या एका प्रक्षेपकासाठीचा निर्मिती खर्च ३० ते ३५ कोटी रुपयांपर्यंत असेल, असं त्यांनी सांगितलं. या प्रक्षेपकाद्वारे ५०० किलो वजनापर्यंतचा उपग्रह अंतराळात नेता येऊ शकेल असं हरिदास यांनी सांगितलं.
यामुळे इस्रो अंतराळ व्यवसाय क्षेत्रात छोट्या ते मध्यम स्वरुपाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सक्षम होऊ शकेल, आणि त्यातूनच इस्रोला या व्यवसाय क्षेत्रात पाय रोवण्याची मोठी संधी निर्माण होईल, असं हरिदास यावेळी म्हणाले.