मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे.
त्यात मणिपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शन जव्हेरी, शिल्पकार भगवान रामपुरे, कुस्ती प्रशिक्षक काका पवार, ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात महत्वाचं योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत, ज्येष्ठ चित्रपट निर्माता दिग्दर्शक सई परांजपे आणि, जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक माधव गाडगीळ यांचा समावेश आहे.
२१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्च रोजी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी नाशिक इथं प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.