Site icon साप्ताहिक एकच ध्येय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रायगड किल्ल्यावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने विविध विकास कामे सुरु आहेत. त्यांची प्रत्यक्ष पाहणी राज्यपाल महोदयांनी केली. रायगड किल्ल्यावर असलेल्या विविध भागात स्वत: जाऊन पाहणी केली. तत्पूर्वी राज्यपाल महोदयांनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. रायगडावर आलेल्या पर्यटकांना त्यांनी हात उंचावून अभिवादन केले आणि चिमुकल्यांशी संवादही साधला. रायगडावर असणाऱ्या पुरातत्व विभागाच्या छोट्या वस्तू संग्रहालयास भेट देऊन पुरातत्व वस्तूंची माहिती जाणून घेतली.

Exit mobile version