Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनमधील भारतीयांना घेऊन येणारे दुसरे विमान नवी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात परतला होता.

दरम्यान चीनमधल्या भारतीयांना घेऊन येणारं दुसरं विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं. या विमानात ३२३ भारतीय नागरिकांसोबतच, मालदीवच्या ७ नागरिकांचाही समावेश आहे. आत्तापर्यंत चीनमधून ६४७ नागरिकांना भारतात परत आणलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना पुढचे १४ दिवस हरियाणातल्या मानेसरइथल्या विशेष कक्षात निरीक्षणाखाली ठेवलं जाईल.

दरम्यान फिलिपीन्समध्ये कोरोना विषाणूनं बाधित एक रुग्ण आज दगावला. चीनशिवाय इतर देशांमधला कोरोना विषाणुनं घेतलेला हा पहिला रुग्ण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

दगावलेला रुग्ण मुळचा चीनमधल्या वूहान शहरातला नागरिक होता. या रुग्णाला तो फिलिपीन्समध्ये येण्याआधीच कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version