Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकसभेत गदारोळ,राज्यसभा स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला. प्रश्नोत्तराच्या तासात, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकूर उत्तर देत असताना काँग्रेससह द्रमुक,बहुजन समाज पार्टी आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून ‘लोकशाही वाचवा’ अशा आशयाचे फलक झळकावत गदारोळ केला, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना जागेवर बसण्याची विनंती केली मात्र, गदारोळ कायम राहिला. राज्यसभेतही याच मुद्द्यावर गदारोळ झाला त्यामुळे कामकाज २  वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

काँग्रेस, डावे पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि अन्य विरोधी सदस्यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला. गदारोळ कायम राहिल्यामुळे पहिल्यांदा कामकाज १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.

त्यापूर्वी राज्यसभेत ओमानचे सुलतान दिवंगत काबूस बिन सईद अलसईद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल सदस्यांनी शोक व्यक्त केला.चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजेच बालअश्लीलते बाबतचे धोके आणि त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम, याचं आकलन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आज राज्यसभेत सादर करण्यात आला.

Exit mobile version