स्त्रीच्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फुले दाम्पत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फायदे आज आपल्या समाजात सर्व स्त्रियांना मिळाल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, महर्षि कर्वे, वि. रा. शिंदे, महात्मा गांधी, दादा धर्माधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी पुरुषांची मोठी परंपरा पाहायला मिळते. तर, मुक्ता साळवी, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, कमला देशपांडे, जनाक्का शिंदे अशा कितीतरी महिला स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, प्रगल्भ स्त्री-पुरुष नाते, स्वतंत्र भारतातील स्त्रियांचे स्थान यासंदर्भात ठाम भूमिका घेऊन उभ्या राहिल्या. त्यामध्ये विद्या बाळ हे नाव देखील ठळकपणे घ्यावे लागेल.
विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी, १९३७ रोजी झाला. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. लोकमान्य टिळकांचे सहकारी न. चिं. केळकर हे विद्या बाळ यांचे आजोबा होते. त्यामुळे बालपणी केसरीतील विचार, हिंदू महासभा यांचा प्रभाव मनावर पडला. त्यांचे मोठे बंधू तसेच पती हे रा. स्व. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी १९७४ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणूक जनसंघार्फे लढवली. त्यात त्या पराभूत झाल्या.
पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्यां म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. १९६० साली वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्राच्या नोकरीचा राजीनामा देऊन १९६४ ते १९८३ या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक होत्या. ‘स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरुषभान येण्याची आवश्यकता आहे,’ असे आग्रही प्रतिपादन करतानाच ते प्रत्यक्षात येण्यासाठी विद्याताईनी आपले आयुष्य खर्ची घातले. स्त्रियांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणा-या विद्याताईनी ‘स्त्री’ या मासिकात सुमारे २२ वर्षे म्हणजे १९८३ पर्यंत काम केले. या काळातच १९८१ मध्ये त्यांनी स्त्रियांच्या समस्यांचा वेध घेणाऱ्या ‘नारी समता मंचा’ची स्थापन केली. १९८२ साली दोन चांगल्या घरातील स्त्रियांचे खून झाले. त्या वेळी विद्या बाळ यांच्या ‘नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन रहदारीच्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रच ढवळून निघाला.
नंतर विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकाच्या पहिल्या २० वर्षात प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे ‘स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक २०१२ साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या संपादिका डॉ. नीलिमा गुंडी होत्या. स्त्रियांच्या चळवळीशी अतूट बांधिलकी मानणाऱ्या या मासिकाने आपला स्वतंत्र ठसा उमटवला. याच मासिकाशी सलग्न ‘सखी मंडळा’ची स्थापनाही विद्याताईनी केली. स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक विषयांची चर्चा या मंडळामाफर्त घडवून गेली. ‘बोलते व्हा’, ‘पुरुष संवाद केंद्र’, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘साथ साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या संस्थाही त्यांनी सुरू केल्या. स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी, म्हणून ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती. त्यातून २००८ साली ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
बलात्कारित मुलीला बलात्कारानंतर मिळालेला पती, कुटुंब आणि गावचा पाठिंबा हे एक समाजासाठी उदाहरण होते. त्यामुळे संघटनेने संबंधितांचा केलेला सत्कार, जनजागृतीसाठी रात्री हातात टॉर्च घेऊन काढलेली ‘प्रकाशफेरी’, एकट्या स्त्रियांसाठी परिषद, सुशिक्षितांमध्येही अन्याय वाढत होते म्हणून सुशिक्षितांसाठीही पथनाट्य, वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येविरोधात निदर्शने-मोर्चा-परिसंवाद, विवाह परिषद, कुटुंब नियोजन परिषद, आत्मसन्मान परिषद किंवा विविध पथनाट़य, निदर्शने, परिसंवाद, ‘दोस्ती जिंदाबाद’ यासारखा अॅसिड हल्ल्याविरोधातील जागृतीसाठीचा कार्यक्रम, लिंगभाव समतेसाठी पुरुषभान परिषद आदी अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून हाती घेतले. अनेक कार्यकर्त्यां तयार केल्या. शहरी आणि ग्रामीण स्त्रियांना जोडणे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी काम केले.
लेख, अनुवाद, कादंबरी, संपादन अशी त्यांची चौफेर लेखणी होती. कृतिशील कार्यकर्त्यां अशीही त्यांची ओळख होती. विशेषत: शहरी आणि ग्रामीण स्त्रियांना जोडणे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी काम केले.