नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OIC अर्थात, इस्लामी सहकार संघटनेनं काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची ‘मध्यपूर्वेसाठीची शांती योजना’ नाकारत, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेला कोणतंही सहकार्य न करण्याचं आवाहन सदस्य राष्ट्रांना केलं.
काही दिवसांपूर्वी अरब राष्ट्रसंघटनेनंही, ‘ही योजना पॅलेस्टाईनच्या लोकांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याचं’ कारण देत, तिला तीव्र नकार दिला होता. जेद्दाह इथं झालेल्या बैठकीत, काल इस्लामी देशांच्या संघटनेनं, या योजनेत पॅलेस्टाईनच्या लोकांच्या आकांक्षांची आणि अधिकारांची परिपूर्ती होत नसल्याचं सांगत या अमेरिकी-इस्रायली शांतियोजनेवर काट मारली.
भविष्यात निर्माण होणाऱ्या पॅलेस्टाईन राष्ट्राचं अरब आणि इस्लामी स्वरूप अधोरेखित करत, पूर्व जेरुसलेम ही त्याची राजधानी असावी, असं OIC नं म्हटलं आहे. तसंच, जेरुसलेम शहरासह पूर्ण पॅलेस्टाईनमधून इस्राईलचं अतिक्रमण हटल्यावरच पूर्ण शांतता प्रस्थापित होऊ शकेल, असंही OIC नं म्हटलं आहे.
तर, अमेरिकेनं गेल्या आठवड्यात मांडलेल्या शांतियोजनेत, जेरुसलेमवर इस्राईलचा पूर्ण ताबा असेल, असं म्हटलं होतं.