Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एनसीसीच्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)मध्ये देण्यात येणाऱ्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविला जातो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी देशात दुसरा क्रमांक पटकावला त्यानिमित्त त्यांना बक्षीस वितरण करताना श्री.ठाकरे बोलत होते.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, शालेय शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह तीनही सेना दलाचे अधिकारी, एन.सी.सी.विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची शिस्त त्यांना आयुष्यभर शिस्तीत राहण्यासाठी उपयोगी ठरते. हे विद्यार्थी भविष्यात ज्या ठिकाणी असतील त्याठिकाणी त्यांच्यामध्ये राष्ट्राबद्दल प्रेम असेल. स्वतः चांगले काम करतील तसेच आजूबाजूला कोणतीही वाईट घटना घडू देणार नाही, यासाठी सदैव सतर्क राहतील त्याबद्दल मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला द्वितीय क्रमांक मिळवून देऊन महाराष्ट्राचा झेंडा उंचावला त्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना श्री. ठाकरे म्हणाले, आपण भविष्यात आपापल्या क्षेत्रात प्रगती कराल परंतु आदर्श नागरिक होण्यासाठी स्वतःच्या मातीला आणि मातेला विसरू नका. विद्यार्थी दशेमध्ये घेतलेले संस्कार व शिक्षण सदैव आदर्श राहण्यासाठी कामी येतात. सर्वगुणसंपन्न सैनिक, नागरिक व्हा, मायेचा ओलावा अंगीकारा आणि देशसेवा करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राला सर्वच स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून देवून देशात महाराष्ट्रला प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प करावा, असेही श्री.ठाकरे यावेळी म्हणाले.

भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षणासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Exit mobile version