Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला व बालविकासाच्या योजनांसाठी आता सर्वसामान्यांच्या सूचनांचा समावेश – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू

चांगल्या आणि दर्जेदार सूचना देणाऱ्यांना पुरस्कार देणार

मुंबई : राज्यातील महिला आणि मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन आता मंत्रालय स्तराबरोबरच क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका ते महिला बालविकास अधिकारी आणि सर्वसामान्य लाभार्थी महिला, पालकांच्या सूचनांवर आधारित योजना राबविणार असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू यांनी आज येथे दिली.

मंत्रालयात श्री.कडू यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक बालविकास योजनेच्या संदर्भात आढावा बैठक झाली. श्री.कडू म्हणाले, महिला आणि बालविकास विभागांतर्गत कुपोषण निर्मूलनासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत क्षेत्रीय स्तरावर काही प्रमाणात अडीअडचणी आढळून येतात. या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका ते महिला बालविकास अधिकारी आणि लाभार्थींच्या महिला पालकांच्या नवनवीन संकल्पना किंवा सूचनांचा विचार करून योजना राबवावा. महिला आणि बालविकास विभागाच्या प्रत्येक योजनेसाठी  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५ चांगल्या व योग्य सूचना एकाच नमुन्यात मागवाव्यात. ज्यांच्या सूचना दखलपात्र किंवा दर्जेदार ठरतील त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याच्या सूचना श्री.कडू यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

किशोरवयीन मुले-मुली शाळेत का जात नाहीत याच्या कारणांची महिला बाल विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तालुका अथवा गावस्तरावरून माहिती मिळवून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात. जेणेकरून शिक्षणापासून वंचित असलेल्या शाळाबाह्य मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल. कुपोषण हे पोषक आहार आणि विवाहित मुलींच्या कमी वयामुळे कुपोषित बालकांचा जन्म होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण निर्मूलनासाठी राज्यातील १३ ते २४ वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यासाठी एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट राबवावा, अशा सूचनाही श्री.कडू यांनी यावेळी केल्या.

यावेळी श्री.कडू यांनी बेटी बचाव, बेटीपढाव, आहारपुरवठा व ई-निविदा प्रक्रिया, पूरकपोषण आहार, शाळाबाह्य मुला-मुलींची माहिती, कुपोषणाची कारणे, अंगणवाडी बांधकाम, शौचालय बांधकाम आणि पाणी पुरवठा योजनांसाठी निधीची तरतूद आणि विनियोजन आदींविषयी आढावा घेतला. आढावा बैठकीला एकात्मिक बालविकास आयुक्त इंद्रा मालो, उपायुक्त गोकुळ देवरे, उपायुक्त श्री.मस्के, महिला बाल विकास विभागाचे सहसचिव ला.रा. गुजर, अवरसचिव गजानन गावंडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version