Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माहुल परिसरातील प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : माहुल येथील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागासह माहुल परिसरातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. राष्ट्रीय हरीत लवाद यांनी दिलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करुन या परिसरातील प्रदुषणाचे नियंत्रण करावे, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, आयसीटीचे प्रा. जी. डी. यादव, एचपीसीएलचे व्ही. एस आगाशे, बीपीसीएलचे पी. व्ही. रवीतेज, निरीचे डॉ. तुहीन बॅनर्जी, सुधीर मल्होत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, माहुल येथील वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादीत न राहता मुंबईतील इतर भागातही होत आहे. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय हरीत लवाद यांनी सूचना दिलेल्या आहेत. माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पुर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी होणे आवश्यक आहे. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी एचपीसीएल, बीपीसीएल यांच्या प्रतिनिधींनीही काही प्रश्न मांडले. रस्त्यांचा प्रश्न, पार्कींगचा प्रश्न आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. यावर संबंधीत विभागांशी चर्चा करुन हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Exit mobile version