पालघर : आदिवासी बांधवांना जंगलातील त्यांच्या हक्काच्या वनहक्क पट्ट्यात शेती करणे, शेतीसाठी विहीर अथवा शेतात घर बांधणे हे सर्वाधिकार मिळणार असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.
डोयापाडा ता. विक्रमगड येथे वयम चळवळ या सामाजिक संस्थेने आदिवासी बांधवांसाठी राज्यपाल श्री.कोश्यारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
केंद्र शासन व राज्य शासन ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करत आहे. आपल्या भागात आल्यावर शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहचल्या असल्याचे पाहिले आहे. डोयापाडा या आदिवासी बहुल तसेच दुर्गम भागात वीज, पाणी, स्वयंपाकासाठीचा गॅस, स्थानिक रस्ते, स्वस्त धान्य दुकाने उपलब्ध झाले आहे, असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यातील अधिकार देण्यात आले आहेत. ज्यांना वनहक्क पट्ट्याचे हक्क अद्याप प्राप्त झाले नाहीत त्यांना लवकरच वनहक्क प्राप्त होतील, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी कृष्णा भवनामृत संघाच्या आश्रमास भेट देऊन सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या. डोयापाडा येथील कार्यक्रमासाठी येत असताना मार्गावरील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले.
यावेळी विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, सर्वश्री उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, विकास गजरे, अर्चना कदम, संजय अहिरे आदी विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.