Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जलवाहिनी दुरुस्तीसाठी काम करणाऱ्या अभियंत्यांचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

मुंबई : जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अहोरात्र काम करुन त्या भागातील नागरिकांना जलद गतीने पाणीपुरवठा सुरु करणारे महापालिका अभियंते, कर्मचारी, अधिकारी यांची भेट घेऊन राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभियंते, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

मुंबई महापालिका कार्यालयात जाऊन मंत्री श्री. ठाकरे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेतली. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह महापालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, महापालिका कर्मचारी मुंबईसाठी दिवस-रात्र काम करीत असतात. आपत्तीच्या काळात हेच कर्मचारी आपत्तीचे संपूर्ण निवारण होईपर्यंत मुंबईच्या रस्त्यावर असतात. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहराचा लौकिक प्राप्त होण्यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. देश-विदेशातून इथे येणाऱ्या लोकांनाही महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामामुळे मुंबई शहराचे आकर्षण वाटते. हे कर्मचारी खऱ्या अर्थाने मुंबईचे हिरो आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड येथील हिलक्रेस्ट सोसायटीजवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे मुंबई उपनगरातील काही भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. पण महापालिकेच्या जल विभागाचे अभियंते, कर्मचारी, अधिकारी यांनी सलग २ दिवस आणि २ रात्री अहोरात्र काम केले. काही कर्मचारी, अभियंते यांनी जलवाहिन्यांच्या आत जाऊन दुरुस्ती काम केले. यामुळे दुरुस्ती काम जलद गतीने पूर्ण झाले. महापालिका कर्मचाऱ्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी मंत्री श्री. ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अभियंते, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

Exit mobile version