मुंबई : समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपटामुळे त्यांचे कार्य, घराघरात पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मंत्रालयात प्रकाशित करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, चित्रपटनिर्माते बाळासाहेब पाटील, दिग्दर्शक दिलीप भोसले उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जबाबदारी स्वीकारून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनावर मराठी व हिंदी सिनेमा तयार करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.