Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलिसांसाठी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात विविध योजनांचा शुभारंभ व लोकार्पण

ठाणे : महाराष्ट्रातील शासकीय घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील. ठाणे शहराचे रुप बदलले परंतु ठाणेकर जनता आजही साधीसुधी आणि प्रेमळ आहे. ठाणेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे उद्गगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

 ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ प्रसंगी श्री.ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमास नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर नरेश म्हस्के, खा.राजन विचारे, आ.प्रताप सरनाईक, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तीन हात नाका येथे उभारण्यात आलेल्या हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्यदिव्य स्मारकाचे लोकार्पण, समूह विकास योजनेच्या (क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, ठाणे महानगरपालिकेच्या ‘पथदर्शी विकासाचे ठाणे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब संकेतस्थळाचे अनावरण कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर ठाणे ई-उद्घाटन, हाजुरी येथील क्लस्टर योजनेचे ई- भूमिपूजन, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कळवा- पारसिक, कोलशेत, वाघबीळ, बाळकूम-साकेत, कोपरी, शास्त्रीनगर, नागलाबंदर खाडी किनारा विकास प्रकल्पांचे ई- भूमिपूजन, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ ई-शुभारंभ, घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे ई-भूमिपूजन, बांधकाम व तोडफोड कचरा पुनर्प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, शहरी जंगले  प्रकल्पाचे ई- भूमिपूजन, विज्ञान केंद्र  प्रकल्पाचे ई- भूमिपूजन, ‘लाडकी लेक ’ दत्तक योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. समूह विकास योजनेच्या(क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, नागरी समूह विकास योजनेमुळे पक्की घरे मिळणार आहेत. ठाणे शहराचे रुप बदलते आहे. नवीन ठाणे शहर पाहताना आजच्या दिवशी मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांची आठवण होते. घरांच्या सर्व योजनांत पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्यात येतील. ठाणेकर जनतेने मला नेहमीच प्रेम दिले आहे. आपल्या सर्वांमुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात महापौर नरेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, ठाणे शहराचा विकास वेगाने सुरु आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने  प्रकल्प महानगरपालिकेस भविष्यात  मिळावेत.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाण्यातील धोकादायक पोलीस वसाहतीचे पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व भागात एसआरए योजना राबविण्याची आवश्यकता आहे. स्लम फ्री सिटी योजना सर्वत्र राबविण्याची गरज आहे. धोकादायक व अनधिकृत इमारतीच्या बाबत भेदभाव केला जाणार नाही, मुंबई महानगर क्षेत्रातील अशा इमारतींचा समूह विकास योजनेंतर्गत विकास करणार आहे. तसाच क्लस्टरचा ठाणे पॅर्टन सर्वत्र राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, समूह विकास योजनेची सुरुवात मुंब्रापासून झाली. गावठाण व कोळीवाडा यांना या योजनेतून न्याय द्यावा. एसआरएअंतर्गत मुंबईप्रमाणे ठाण्यातही 300 स्क्वेअर फुटाचे  घर देण्यात यावे. समूह विकास योजनेत मूळ भूमिपुत्रांना न्याय मिळावा.  ठाणे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या 27 एकर भूखंडावर मनपाच्या वतीने  पक्षी अभयारण्य उभारण्यात यावे, असेही ते म्हणाले.

सदनिका स्टॉलचे वाटप 

महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात बीएसयूपी योजनेंतर्गत सदनिका वाटप व रोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले.अनाथ, निराधार, निराश्रित बालके तसेच एचआयव्ही बाधित पालकांची मुले यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात अनुदान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Exit mobile version