‘यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या एमबीए विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम
पिंपरी : संसदेत नुकतेच सादर करण्यात आलेल्या ‘केंद्रीय अर्थसंकल्पाचे परिणाम’ या विषयावरील चर्चासत्र चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे संपन्न झाले. अर्थसंकल्पापूर्वी सादर करण्यात आलेले आर्थिक सर्वेक्षण अहवाल, दिनांक एक फेब्रुवारी रोजी सादर झालेले अर्थसंकल्पाचे थेट प्रसारण व त्यानंतर अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे होणारा परिणाम अशा तीन टप्प्यात हे चर्चासत्र एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. अर्थसंकल्पातील वार्षिक वित्तीय तरतूद, भांडवली खर्च, एकत्रित निधी, कॉर्पोरेट कर, सीमा शुल्क, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, वित्तीय तूट अशा पारिभाषिक संज्ञा, त्याचा नेमका अर्थ व विश्लेषण विद्यार्थ्यानी समजून घेतले. संस्थेचे प्रा. महेश महांकाळ यांनी विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या विविध तरतुदी व त्यांचा उद्योगजगत, कृषी, व्यापार आणि सामान्य जनजीवनावर होणारा परिणाम विस्तृत विशद केला.
अर्थसंकल्पातील नमूद केलेल्या गोष्टी, विशेषतः यंदाच्या अर्थसंकल्पातील विशेष लक्षणीय ठरलेला ‘थालीनॉमिक्स’ हा शब्दप्रयोग आणि प्रत्यक्ष दैनंदिन जीवनावर होणारा त्याचा परिणाम यांच्यातील संबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.
एमबीएच्या विद्यार्थ्यांनी आताच अर्थसंकल्प समजून घेतल्यामुळे भविष्यात नोकरी किंवा व्यवसाय करताना व्यवस्थापन कौशल्यासोबतच आर्थिक बाजूंची जाण असणारे व्यक्तिमत्व तयार होण्यास मदत होईल, याहेतूने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी ही अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारी सादरीकरणे प्रस्तुत केली.
अशा उपक्रमांमुळे विचारकक्षा रुंदावण्यास मदत होते असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.