ठाणे : डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक कारखान्यांची तपासणी करून वर्गवारी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे सर्व कारखान्यांना बंधनकारक आहे. जे कारखाने नियम, निर्देश पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर विनिता राणे, मुख्य सचिव अजोय मेहता, खा. श्रीकांत शिंदे, प्रधान सचिव, नगर विकास मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आ. विश्वनाथ भोईर, आ. जगन्नाथ शिंदे, आ. रविंद्र फाटक, पर्यावरण व प्रदुषण मंडळाचे सचिव ई. रविंद्रन. कल्याण मनपा आयुक्त गोविंद बोडके आदी उपस्थित होते.
डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबत 3 टप्प्यात कार्यवाही आणि कारवाई करावी. पहिल्या टप्प्यात शासनाच्या यंत्रणांनी कारखान्यांची तपासणी करून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात. त्या सुचनांची पूर्तता करणे सर्व कारखाना मालकांवर बंधनकारक असेल. दुसऱ्या टप्प्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुचविल्याप्रमाणे घातक केमिकल वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आणि तिसऱ्या टप्प्यात औद्योगिक वसाहतींना लागून ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्याठिकाणी असलेले घातक रसायनांचे कारखाने अन्यत्र हलविण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे जिल्हा प्रशासनास यावेळी दिल्या.
बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. महापालिका प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवून नियोजन केल्यास ज्या उपक्रमांना निधीची आवश्यकता आहे त्यांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी संगितले.
महापालिकेने शहर स्वच्छता, वाहतूक बेटे, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण न करता रस्ते मिलींग अँण्ड फिनीशिंग पध्दतीने बनविणे, दुभाजकांची व्यवस्था करणे, फेरीवाला हटाव मोहिम राबविणे, रस्त्यावरील बेवारस वाहने हालविणेबाबत तातडीने कार्यवाही करावी, पर्यटन विकास आराखडा, धोकादायक इमारतीसाठी समूह विकास योजना, झोपडपट्टी विकास योजना, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, रेल्वे स्थानक परिसर विकास आदी विषयावर नियोजन करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिले. कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीची कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी असे ही श्री ठाकरे यांनी सांगितले.
रस्ते, शहर सुशोभीकरण, स्वच्छता यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. यासाठी महापालिकेने तातडीने आराखडा सादर करावा अशा सूचना यावेळी त्यांनी केली. पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी शहरविकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना यावेळी मनपा प्रशासनास दिल्या. नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांनी
मनपाने कामाचा प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले. तसेच अत्यावश्यक रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी देण्यात येईल त्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे सांगितले. मनपा आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रास्तविक आणि सादरीकरण केले.