इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणात पुण्यासह 114 शहरांचे मूल्यांकन होत आहे
पुणे : नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत या दृष्टीने कोणत्या शहरांची राहण्यासाठी योग्यता (लिव्हेबिलिटी) अधिक आहे याबाबत केंद्र सरकारकडून ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या (MoHUA) वतीने स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ‘इज ऑफ लिव्हिंग’ सर्वेक्षणात 114 शहरांचे मूल्यांकन संस्था व प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा (शिक्षण, आरोग्य), आर्थिक आणि भौतिक संरचना अशा चार श्रेणींमध्ये एकूण 153 संकेतकांच्या आधारे हे मूल्यांकन करून राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी (लिव्हेबिलिटी इंडेक्स) जाहीर करण्यात येणार आहे.
‘राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर’ म्हणून 2019 मध्ये पुणे शहराला भारतात लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. या क्रमवारीतील पुणे शहराचे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी या सर्वेक्षणात जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पुणे महापालिका व पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येत आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात येईल. ही प्रक्रिया 1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी आपले शहर कसे आहे, येथील राहणीमान किती सुलभ आहे याबाबत नागरिकांनी या सर्वेक्षणात अभिप्राय द्यायचे आहेत.
शहरातील शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण व निवारा, गतीशीलता, राहणीमानाचा दर्जा, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा व सुरक्षितता, मनोरंजन, करमणूक, आर्थिक क्षमता, आर्थिक संधी, शाश्वतता, पर्यावरण, हरित ठिकाणे व इमारती, वीजेचा वापर, शहराची स्थितीस्थापकत्व, लवचिकता, सार्वजनिक सेवा, प्रशासन सेवा, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेबरोबर इतर सुविधांचा कशा प्रकारे स्तर काय आहे याबाबत प्रतिक्रिया नोंदविण्याची संधी नागरिकांना या सर्वेक्षणात आहे. यावरून आपल्या शहराचे प्रगती पुस्तक (रिपोर्ड कार्ड) ठरणार आहे.
पुणेकर नागरिकांना पुणे शहराचा अभिमान आहे. यासाठी आपण सर्व नागरिक एकत्र येऊन दाखवून द्यायला हवे की आपलं पुणे शहर इतर शहरांच्या तुलनेत सर्वसामान्यांसाठी सुलभ व उपयुक्त शहर आहे. लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये पुणे अव्वल स्थानी राहिल्याने शहराच्या लौकिकात भर पडणार असून, शहराचा विकास व प्रशासकीय वाटचालीत ते साह्यभूत ठरणार आहे.
क्यूआर कोड स्कॅन करून किंवा https://eol2019.org/Citizenfeedback या लिंकवर जाऊन पुणेकर नागरिकांनी ‘इज ऑफ लिव्हिंग’ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग नोंदवावा. यामध्ये चोवीस प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्या प्रश्नांखालील आपणास योग्य वाटणारा पर्याय निवडून अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, आयुक्त श्री. शेखऱ गायकवाड व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे. https://eol2019.org/Citizenfeedback या लिंकवर जाऊन सर्वेक्षणात सहभागी व्हा.
या सर्वेक्षणात जास्तीत नागरिकांना सहभाग नोंदविण्याची संधी देण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.