नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने 14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती शिवाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती शिवाजी महोत्सवात’ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून हे सर्व कार्यक्रम येथील रफी मार्गावरील मावळणकर सभागृह आणि डेप्युटी स्पीकर सभागृहात करण्यात येणार आहे.
प्रसिध्द नाटक ‘जाग उठा है रायगड’ चे सादरीकरण प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित लोकप्रिय ऐतिहासिक नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे हिंदी रुपांतरित ‘जाग उठा है रायगड’ हे नाटक महोत्सवाच्या आरंभीच 14 फेब्रुवारी रोजी सायं.6.30 वा. सादर होणार आहे. ‘जाग उठा है रायगड’ हे संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त नाटक असून पुणे येथील स्वतंत्र कला ग्रुपची निर्मिती आहे. या नाटकाचे दिग्दर्शक अभिजीत चौधरी तर निर्माते युवराज शाह आहेत.
महोत्सवामध्ये 17 फेब्रुवारी रोजी दिल्ली स्थित शिवाजी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन तथा विजेत्यांना खासदार मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
19 फेब्रुवारी : शिवप्रतिमेला पुष्पार्पण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती दिनी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता येथील मिंटो रोड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात येणार आहे.
20 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 ते 8.00 दरम्यान येथील डेप्युटी स्पीकर सभागृहात दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिरूद्ध देशपांडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर व्याख्यान होणार आहे.
‘शिव गौरव गाथा’ संगीतमय कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवगीतांवर आधारित ‘शिव गौरव गाथा ’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येणार असून याच कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक अजीत परब, गायक मयुर सुकळे, गायिका केतकी भावे -जोशी आणि शाल्मली सुखटणकर ही संगीतमय प्रस्तुती देतील .