Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बाडन-वुर्तम्बर्गच्या धोरण समन्वय मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : जर्मनीतील बाडन-वुर्तम्बर्ग या राज्याच्या धोरण समन्वय मंत्री तेरेसा शॉपर यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

बाडन-वुर्तम्बर्गची राजधानी असलेल्या स्टूटगार्ट व मुंबई या दोन शहरांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सामंजस्य करार अस्तित्वात असून हे सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे तेरेसा शॉपर यांनी सांगितले.

बाडन-वुर्तम्बर्ग हे राज्य जर्मनीच्या वाहन उद्योगामध्ये अग्रेसर असून ऑडीसह अनेक गाड्यांची निर्मिती तेथे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात देखील बाडन-वुर्तम्बर्ग महाराष्ट्राला सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षणासाठी जर्मनी हे भारतीयांमध्ये इंग्लंड इतकेच पसंतीचे ठिकाण असल्याचे जर्मनीचे वाणिज्यदूत जुर्गन मॉर्हार्ड यांनी राज्यपालांना सांगितले.

१८०० जर्मन कंपन्या भारतात!

आज भारतात तब्बल १८०० जर्मन कंपन्या कार्यरत असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात ४० टक्के कंपन्या कार्यरत आहेत. एकूण ३० जर्मन कंपन्या मुंबई स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत असल्याचे मॉर्हार्ड यांनी सांगितले.

जर्मनी आणि भारत देशामध्ये आर्थिक सहकार्यासोबत शैक्षणिक, सांस्कृतिक व परस्पर लोक-सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version