Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक, विचारवंत होते’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात’ पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : दोन वेळा जन्मठेप होऊन देखील न डगमगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील अद्भुत क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत व उत्तुंग प्रतिभा लाभलेले कवी होते. देश पारतंत्र्यात असताना हजारो लोकांनी हाल अपेष्टा सोसल्या, अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अशा स्वातंत्र्य सेनानींमध्ये सावरकर यांचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे काढले.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात’ या डॉ. अशोक मोडक लिखित पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी (दि.7) मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सन 1857 च्या लढ्याची ब्रिटिशांनी ‘शिपायांचे बंड’ अशी संभावना केली असताना तो लढा इंग्रजांविरुद्ध देशाचा पहिला स्वातंत्र्य लढा होता, असे सावरकरांनी निक्षून सांगितले. सावरकरांसारख्या थोर नेत्यांच्या योगदानामुळेच अनेक झंजावातांना सामोरे जात देश आज ताठ मानेने उभा आहे, असे राज्यपाल म्हणाले. सावरकरांनी जातीभेदाला नेहमी विरोध केल्याचे स्मरण देत जातीभेद दूर करणे ही सावरकरांना खरी आदरांजली ठरेल, असे कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी लेखक डॉ.अशोक मोडक यांनी पुस्तकामागची भूमिका सांगितले. महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चन्द्रशेखर कुलकर्णी यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली, तर कार्यवाह जयप्रकाश बर्वे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीचे कार्यवाह वसंत रानडे, महाराष्ट्र सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version