नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण झाल्यावर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन मार्चपर्यंत तहकूब झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं.
या सरकारच्या काळात वित्तीय शिस्त टिकवण्यात आली आणि महागाई आणि अन्न चलनफुगवट्याचा दर नियंत्रणात ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. देशाचं सकल देशांतर्गत उत्पादन 2014-15 मध्ये दोन ट्रिलियन डॉलर होतं. 2019-20 पर्यंत ते 2 पूर्णांक 9 दशांश ट्रिलियनपर्यंत वाढलं, असं त्या म्हणाल्या.
जीएसटी संकलनात सातत्यानं वाढ होत आहे आणि चालू आर्थिक वर्षात गेल्या सहा महिन्यात त्यानं एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असं त्यांनी सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे आणि सरकारनं अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, असं त्यांनी नमूद केलं.