नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व शिक्षणमंडळांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय अनिवार्यपणे शिकवला जावा यासाठीचं विधेयक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाणार आहे.
मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. सध्या महाराष्ट्रात सुमारे २५ हजार शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय शिकवला जात नाही, असं आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र हे विधेयक संमत झाल्यानंतर या सर्व शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा या विषयाचा अंतर्भाव करावा लागेल असं त्यांनी सांगितलं.
या विधेयकासाठीच्या मसुद्यात कोणत्या तरतुदी असाव्यात यावर काम सुरु आहे, २४ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं.