Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी हब तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक असे सर्वात पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. या उद्योगांच्या वाढीसाठी राज्यात इन्क्युबेशन हब तयार करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय  गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत आहे, असे उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांनी सांगितले. ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2020’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने उद्योजकांसोबत झालेल्या एका बैठकीत श्री.देसाई बोलत होते. मुंबईमध्ये ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही परिषद फेब्रुवारी 12 ते 14 या दरम्यान होणार आहे. या परिषदेचे हे 28 वे वर्ष आहे.

उद्योगमंत्री श्री.देसाई म्हणाले, मुंबईला ज्याप्रमाणे देशाची औद्योगिक राजधानी म्हटले जाते त्याचप्रमाणे लवकरच सॉफ्टवेअरची राजधानी म्हणूनही ओळख व्हावी. राज्यात इन्क्युबेशन हब तयार करण्यासाठी ‘नॅसकॉम’सोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी 50 हजार चौरस फूट जागेवर 200 उद्योगांसाठीची व्यवस्था करण्यात येईल. तीन दिवस चालणारी ही परिषद राज्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सिडको, एमएमआरडीए या सर्व संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत.

नॅशनल असोसिएशन ऑफ सर्व्हिसेस अँड सॉफ्टवेअर कंपनी  म्हणजे नॅसकॉम ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिखर संस्था असून नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरमच्या वार्षिक आयोजनाचे राज्य शासन अधिकृत भागीदार आहेत. जागतिक स्तरावरील या परिषदेला उद्योग जगतातील दिग्गज, तंत्रज्ञान प्रचारक, शासकीय अधिकारी आणि जगभरातील माध्यम प्रतिनिधी उपस्थित  आहेत. आयटी आणि संलग्न उद्योग क्षेत्रातील ही परिषद  जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण मानली जाते.

यावेळी  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, नॅसकॉमचे अध्यक्ष केशव मुरुगेश, देबजानी घोष यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते.

Exit mobile version