मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने हॉटेल इंडस्ट्री, करमणूक, इव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील उद्योजक, तज्ञ, नामांकित व्यक्ती यांच्यासमवेत बैठक घेऊन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच चर्चा केली.
मुंबई हे देशातील करमणूक क्षेत्राचे महत्त्वाचे ठिकाण आहे. अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या कार्यक्रमाचे आयोजन येथे करीत असतात. या कार्यक्रमाला पर्यटक पसंती दर्शवित असतात. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय हे एकमेकांशी निगडीत विषय असून या दोन्ही विषयाच्या विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास पर्यटनाला चालना मिळेल. तसेच रोजगार व महसूल वाढ होण्यास मदत होईल, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
इव्हेंट, मनोरंजन आणि हॉटेलिंगसाठी लागणारी परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत या व्यवसायाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशन व महाराष्ट्रातील हॉटेल इंडस्ट्रीतील नामांकित व्यक्ती यांच्या समस्या व नवीन संकल्पना मंत्री श्री. ठाकरे यांनी जाणून घेतल्या. या व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.