Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डबेवाल्यांच्या घरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील डबेवाल्यांच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मुंबईतील डबेवाल्यांकरिता घरबांधणी, मुंबई डबेवाला भवन तसेच अन्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कामगार विकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मुंबईतील डबेवाल्यांच्या कौशल्याचे जगभरात कौतुक होते. गेल्या 130 वर्षापासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करावी. डबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक येत असतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असावी. त्यासाठी मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी किरण गवांदे, रामदास करवंदे, रितेश आंद्रे, वि. स. काळखेले, विनोद शेटे, संजय गडदे उपस्थित होते.

Exit mobile version