मुंबई : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागामार्फत हाती घेतली जाणार आहेत. रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
शासनाच्या रोहयो विभागामार्फत जिल्हाधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांनाही याबाबत आदेश पाठविण्यात आले आहेत. या माध्यमातून स्थानिक रोहयो मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच ऐतिहासीक वारसा लाभलेल्या रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांचे सुशोभीकरण होण्यास मदत होईल, असे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. राज्यातील किल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन करण्याचे कामही आता रोहयो योजनेतून करता येत आहे. त्यामाध्यमातून किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. किल्ले परिसरात वृक्ष लागवड करणे, रस्त्यांचे सुशोभिकरण करणे, जलसाठ्यांचे संवर्धन करणे अशा विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात येत आहेत. रायगड किल्ले परिसरात नवीन होणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची कामे हाती घेण्यात यावीत, अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. रायगड विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण व संगोपनाच्या कामाचे नियोजन करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.