Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गावात कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक येतात का? – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली विचारणा

‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ उपक्रमाची सुरुवात

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी 7 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषिमंत्र्यांनी केली असून आज त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली.

शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषीमंत्री श्री.भुसे यांनी सुरु केला असून कृषी सचिव, आयुक्त यांनी 15 दिवसातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत. या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही कृषिमंत्री भुसे यांनी विभागाला सूचना दिल्या आहेत.

नागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करुन कृषिमंत्र्यांनी आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजना, कांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषिमंत्र्यांनी यावेळी केली. श्री.भुसे यांनी दिवसभरात अजंग-वडेल, झोडगे व माळमाथा भागातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला.

Exit mobile version