Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे : केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी केल्या.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार अमर साबळे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. जावडेकर यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले,  वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो ची मदत होणार असून मेट्रोच्या कामांसाठी केंद्र सरकार आवश्यक निधी पुरवेल, तथापि ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत. जिल्ह्यात माध्यान्ह भोजनाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून मुलांच्या वजन व उंचीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे, हे या योजनेला मिळालेले यश आहे.  प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनासंबंधी सविस्तर आराखडा तयार करावा, असे सांगून घनकचरा व्यवस्थापन व कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर द्या, असे श्री. जावडेकर म्हणाले.

मुळा-मुठा नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असे सांगून ते म्हणाले, मुळा-मुठा संवर्धनासाठी संबधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील. हिंजवडी, वाघोली सह पुण्यात गजबजलेल्या बऱ्याच भागात वाहतूक समस्या भेडसावत असून ही समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. येत्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करुन मार्ग काढू, असेही श्री. जावडेकर म्हणाले.

खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्ह्यातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन समन्वयातून लवकरात लवकर प्रश्न सोडवायला हवेत, असे सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेट्रोच्या कामाची सद्यस्थिती, माध्यान्ह भोजन, अंगणवाडी पूरक पोषण आहार, शहर व लगतच्या भागातील कचरा व्यवस्थापन, रेल्वे स्टेशन वरील वाय-फाय सुविधा, आयुष्यमान भारत योजना, समग्र शिक्षा योजना आदी विषयांवर चर्चा झाली.

Exit mobile version