Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील -राजकुमार बडोले

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी स्वयंसेवी संस्था व शासन एकत्रितरित्या प्रयत्न करीत आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग  आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळा येथील विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित चर्चासत्राच्या उद्धाटनप्रसंगी श्री. बडोले बोलत होते.

यावेळी श्री.बडोले म्हणाले, आधुनिक जीवनशैलीमुळे विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाली असून त्यामुळे दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात आजमितीस ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा कोटी आहे. त्यात 53 टक्के ज्येष्ठ महिलांची संख्या आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आरोग्य,आर्थिक, सामाजिक सुरक्षा या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्यासोबतच त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल याचाही विचार करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांद्वारे मदत करण्याच्या सूचना शासनाच्या विविध विभागांना देण्यात आल्या आहेत.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 1660 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. अनुदानित व मातोश्री वृद्धाश्रमांतर्गत गरजू, गरीब व निराधार ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची सुविधा व सर्वतोपरी मदत देण्यात येते. या वृद्धाश्रमांना दरमहा देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यातील वृद्धाश्रमांची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन केली जाईल.

सामाजिक प्रबोधन करून तरूणांमध्ये ज्येष्ठांबद्दल आदर व स्नेहाची भावना रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याची आवश्यकता असून या सन्मानातूनच भविष्यातील पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल.

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या चंद्रकांत जोशी, विजय औंदे व विजय गणाचार्य यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांची समाजातील प्रतिमा व अपेक्षा या विषयावरील चर्चासत्रात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते विजू खोटे,ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुषमा शिरोमणी,हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर,फेस्कॉमचे विजय औंदे व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version