मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर ,दो गौतम’ या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले. यावेळी माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. सूर्यबाला,ज्येष्ठ कथाकार भूपेंद्र पंड्या, राजीव नौटियाल मंचावर उपस्थित होते. नवनीतचे संपादक व कवी डॉ.विश्वनाथ सचदेव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, स्व. नंदकिशोर नौटियाल हे एक चांगले साहित्यिक, लेखक, विचारवंत आणि पत्रकार होते. त्यांचे विचार या पुस्तकातून समाजाला प्रेरणा देतील. सध्या समाजात पुस्तक खरेदी करून ते वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे .त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्याची गरज आहे.
यावेळी स्व. नौटियाल यांच्या ‘नूतन सबेरा’ या साप्ताहिकाला राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
स्व. नौटियाल यांच्या स्मरणार्थ यावेळी पद्मश्री अनुप जलोटा यांच्या ‘भजन संध्या’ हा गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.