मुंबई : उद्यापासून सुरु होणाऱ्या 12 वीच्या अंतिम परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ॲड.परब यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये 12 वीची परीक्षा हा निर्णायक टप्पा असतो या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून आपल्या करिअरची दिशा निश्चित करण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली असते. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवन प्रवासात एसटीचे योगदान अनन्यसाधारण असे आहे.
शासनाने शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळा- महाविद्यालयापर्यंत प्रवास करण्यासाठी एसटीच्या बस प्रवासात 66 टक्के सवलत दिली आहे तसेच मुलींसाठी इयत्ता १२ वी पर्यंत एसटी बस प्रवास मोफत केला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी दररोज एसटी बसने प्रवास करतात. त्यांना त्यांच्या घरापासून शाळा- महाविद्यालयापर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी एसटीने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या निर्णायक व कसोटीच्या क्षणामध्ये एसटी महामंडळ सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही परिवहन मंत्री ॲड.परब यांनी दिली आहे.