Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उद्यापासून १२ वीची परीक्षा; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा देण्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) उद्या, दि. 18 फेब्रुवारीपासून राज्यात सुरु होत आहे. महत्त्वाची असणारी ही परीक्षा तणावमुक्त वातावणात द्यावी, असे आवाहन करून शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड आपल्या संदेशात म्हणात, करिअर निवडण्यासाठी बारावीची परीक्षा खूप महत्त्वाची असते. परीक्षा कालावधीत प्रसन्न व हसतमुख रहावे आणि कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने उत्तरे लिहावीत. परीक्षेचे दडपण घेतल्यास केलेला अभ्यासही आठवत नाही असा अनुभव आहे. तणावमुक्त वातावरणात मुलांना परीक्षा देता येण्यासाठी पालकांनीही काळजी घेतली पाहिजे. परीक्षांच्या दिवसांमध्ये मुलांना सारखे-सारखे अभ्यासाबद्दल विचारू नये. तसेच घरातील वातावरण हलके-फुलके आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उद्यापासून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसणार आहेत. यात 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी, तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यात 3 हजार 36 परीक्षा केंद्र असणार आहेत.

परीक्षा कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळांमध्ये विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रात अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकूण 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळांमध्ये 10 समुपदेशकांची तसेच जिल्हानिहाय समुपदेशकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version