नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांची सी ओ पी-१३ परिषेद आजपासून गुजरातमधल्या गांधीनगर येथे सुरु झाले असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परिषदेचं उद्घाटन केले. पृथ्वीला जोडणाऱ्या या स्थलांतरीत प्रजातींचे त्यांच्या घरी स्वागत आहे,अशी परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेचा लोगो कोलम या दक्षिण भारताच्या कलेने प्रेरित आहे.
अमुर फालकने, हम्पबॅक व्हेल आणि सागरी कासावासारख्या मुख्य स्थलांतरीत प्रजातीचे वर्णन करण्यासाठी या लोगोमध्ये कोलम कलेचा वापर केला आहे. या परिषदेचा मॅसकॉट जीवी अर्थात द ग्रेट इंडियन बस्टर्ड हा आहे. ही अतिशय दुर्मिळ प्रजाती असून वन्य जीव कायदा १९७२ अंतर्गत संरक्षण दर्जा देण्यात आला आहे. १३० देशांचे प्रतिनिधी, प्रसिद्ध संवर्धनतज्ञ तसेच वन्यजीवांच्या जतन संवर्धनासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटना या संमेलनात सहभागी होत आहेत.
या संमेलनादरम्यान एका विशेष दालनात वन्यजीवांच्या संवर्धनासाठीच्या उपयुक्त पद्धतींचे सादरीकरण केले जाणार आहेत. या संमेलनाचे यजमान या नात्याने ३ वर्षांसाठी भारताकडे अध्यक्षपद असणार आहे.
स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षणविषयी १९८३ ला झालेल्या आंतरराष्ट्रीय करारात भारतही सामील झाला होता. त्यानुसार भारताने अशा वन्यजीव प्रजातींच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. ही परिषद २२ फेब्रुवारीपर्यत चालणार आहे.