नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करुनही या दहशतवादी गटांना अजूनही निधी पुरवठा होत असून, त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरुच आहेत,अशी माहिती आर्थिक कारवाई कृतीदलानं दिली आहे.
हे दल, आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांना मिळणाऱ्या निधीवर बारीक लक्ष ठेऊन असतं, दहशतवाद्यांना निधी देण्यासंदर्भात या दलानं कठोर नियम लागू केले आहेत. भारताला लक्ष्य करणाऱ्या, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना, पाकिस्तानकडून समर्थन मिळत आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भारतानं या दलाकडे केली आहे.
आर्थिक कारवाई कृती दलाची एका आठवड्याची परिषद सध्या पॅरिसमध्ये सुरु आहे. या परिषदेत पाकिस्तानसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, पाकिस्तानला या दलाच्या करड्या यादीत कायम ठेवायचं की, काळ्या यादीत टाकायचं किंवा कोणत्याही यादीत नं टाकण्याबाबत निर्णय होणार आहे.
निधी मिळवण्यासाठी दहशतवादी संघटना विविध मार्गांचा उपयोग करत असून समाजमाध्यमांद्वारे नवे समर्थक आणि देणगीदार शोधत आहेत, असं या दलाने पाकिस्तानचे नाव न घेता या परिषदेत सांगितलं.