Site icon साप्ताहिक एकच ध्येय

छत्रपतींचे कार्य समजण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासावे : मारुती भापकर

शिवजयंतीनिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला स्वत:ची करगंळी कापून रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दिनदुबळ्यांना, कष्टकरी शेतक-यांना न्याय दिला. महाराजांनी त्यांच्या सैन्यात बहुजन, बारा बलुतेदार, अलुतेदार यांच्यासह मुस्लिमांना देखील सहभागी करुन घेतले होते. त्यांनी कधी जातीयवाद केला नाही. छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे, असे मार्गदर्शन माजी नगरसेक मारुती भापकर यांनी केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा फुले पुतळा येथे विविध सामाजिक संघटनांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भापकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते. यावेळी माजी नगरसेवक प्रताप लोके, मानव कांबळे, आनंदा कुदळे, गिरीधारी लड्डा, प्रताप गुरव, सुरेश गायकवाड, संतोष जोगदंड, विशाल जाधव, हणुमंत माळी, काळुराम गायकवाड, इंदू घनवट, नंदा करे, बाळकृष्ण करे, गिरीष वाघमारे, विजय गिरमे, अनिल साळुंके, वैजनाथ शिरसाट, विलास गव्हाणे, अनिल ताजणे, दशरथ डोके, अरविंद दरवडे, लक्ष्मण घनवट, सुर्यकांत ताम्हाणे, बी.सी.राऊत, विश्वास राऊत, संजय बनसोडे, सुभाष जाधव, दिलीप काकडे, आप्पा गुब्याड, शोभित घाडगे, महादेव लामतुरे, विनायक कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संयोजनात नागरी हक्क सुरक्षा समिती, ओबीसी संघर्ष समिती, बारा बलूतेदार संघटना, महात्मा फुले जनसेवा मंडळ, सत्य शोधक ओबीसी परिषद, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बहुजन हिताय – बहुजन सुखाय ग्रंथालय चळवळ, सम्यक विद्यार्थी चळवळ, महाराष्ट्र माळी महासंघ आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यंनी सहभाग घेतला होता.

भापकर म्हणाले की, रायगडावर दुर्लक्षित असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. पुण्यात येऊन 19 फेब्रुवारी 1869 रोजी दहा दिवसांची सार्वजनिक शिवजयंती गंज पेठेत सुरु केली. यावेळी लोकमान्य टिळक यांचे वय तेरा वर्ष होते. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंतीला आणखी मोठे रुप दिले. सध्याच्या आधुनिक काळात जातीय, धार्मिक अस्मिता कमी होणे अपेक्षित असताना त्या जास्त टोकदार होत असल्याचे दिसते. सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पुढारी जोपर्यंत शब्दाला कृतीची जोड देत नाहीत, तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. राष्ट्र पुरुषांची जाती – धर्मात विभागणी करण्याऐवजी त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून ते आचरणात आणावे असेही भापकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राविरुध्द फिडेल कॅस्ट्रो याने बारा वर्षे लढा दिला. फिडेल कॅस्ट्रोचे राष्ट्र जागतिक नकाशावर दिसत देखील नाही, एवढे छोटे आहे. परंतू छत्रपतींच्या गनिमी काव्याचा अभ्यास करुन फिडेल कॅस्ट्रोने अमेरिकेला जेरीस आणले होते.

देशातील 7/12 (सात बारा) उता-याचे निर्माण करते आणि शक करते छत्रपती शिवाजी महाराज आहेत असेही मानव कांबळे यांनी सांगितले.

स्वागत, प्रास्ताविक आनंदा कुदळे, सुत्रसंचालन गिरीष वाघमारे आणि आभार विशाल जाधव यांनी मानले.

Exit mobile version