Site icon साप्ताहिक एकच ध्येय

 आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न

गायिका सावनी रवींद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण.

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये आयोजित करण्यात आलेला क्रिसेंडो हा वार्षिक कला क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात पुणे व पिंपरी  चिंचवड परिसरातील २२ व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांचे सुमारे तीनशेहुन जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.

याप्रसंगी बुद्धिबळ,कॅरम, क्रिकेट, फेस पेंटिंग, गायन, नृत्य, रांगोळी, नेमबाजी, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, (बेस्ट फ्रॉम वेस्ट), टेबल सॉकर, ऍड मानिया (जाहिरात तयार करणे), अभिरूप शेअर बाजार (मॉक स्टॉक) या स्पर्धांमधील  विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तर सर्व स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ द इयर’ या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या प्रवरा सेंटर फॉर मॅनेजमेन्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (पीसीएमआरडी) च्या संघाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गायक रवींद्र घांगुर्डे, गायिका सावनी रवींद्र व आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह (करंडक) प्रदान करण्यात आले.

क्रिसेंडोची यंदा ‘इनक्रेडिबल इंडिया’ अर्थात ‘अतुल्य भारत’ ही संकल्पना असल्याने विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नृत्य आणि गायन अविष्करामध्येही याच आधारावर सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून  सुप्रसिद्ध सिने छायाचित्रकार अतुल वाघ व फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे मेकअप विभाग प्रमुख अनिल वैश्यक यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या मराठी, हिंदी गीतांमुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसमवेत पालकांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बारी, पूजा साळवेकर, स्वप्नील सोनावणे, पूजा मोरे, कुणाल सोनावणे,गणेश कलशेट्टी व ओंकार वाघ या विद्यार्थ्यांनी केले.

तर या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पवन शर्मा, प्रा.अमर गुप्ता, डॉ. वंदना मोहंती, डॉ. अमित गिरी, डॉ. पुष्पराज वाघ, प्रा.सारंग दाणी,संदीप गेजगे, आदिती चिपळूणकर, अंजली धकाते, प्रा. महेश  महांकाळ, योगेश  निकम, अभिजीत  चव्हाण आदींनी विशेष सहकार्य केले.

Exit mobile version