पुणे : राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यात राबविण्यात येत असलेल्या ‘निर्मल वारी’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘वारकऱ्यांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे’ ही नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. त्यांच्या सेवेसाठी प्रशासनाकडून पाणी, शौचालय, वाहतुक, वीजपुरवठा यासह विविध सुविधा पुरविल्या जातात. विशेषत: पुणे जिल्हा परिषदेकडून दोन्ही पालखी मार्गावर फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
यावर्षी एकूण 1 हजार 600 फिरती शौचालये पालखी मार्ग, तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी असतील. परंतू, वारकऱ्यांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत शौचालयांची संख्या दरवर्षी अपुरी पडते. त्यामुळे मागील वर्षी पालखी मार्गावरील ग्रामस्थांनी त्यांची वैयक्तीक शौचालये वारकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, तसेच वारकऱ्यांना त्याबाबत माहिती व्हावे यासाठी शौचालयावर पांढऱ्या रंगाचा झेंडा लावावा, असे आवाहन करण्यात आले. त्याला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे अनेक वारकऱ्यांची सोय झाली.
आतापर्यंत हवेली तालुक्यातील 2 हजार 546, बारामतीमध्ये 850, दौंड येथे 1 हजार 420, पुरंदरमध्ये 2 हजार 330 तर इंदापूरमध्ये 501 वैयक्तिक शौचालय उपलब्ध झाली आहेत. पुढील पंधरा दिवसात ही संख्या वाढेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सांगितले.