राज्यात 4 जण निरीक्षणाखाली
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विशेष विमानाने चीनच्या वुहान भागातून भारतात आलेल्या प्रवाशांना दिल्ली आणि मानेसर आर्मी कॅम्प येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. विलगीकरण कक्षातील 14 दिवसांचा कालावधी संपल्याने आज महाराष्ट्रातील पाच प्रवासी राज्यात परतले आहेत. काल 36 प्रवासी राज्यात परतले होते. आतापर्यंत वुहान येथुन राज्यात परतलेल्या प्रवाशांची संख्या 41 झाली आहे. या सर्व प्रवाशांचा 14 दिवसापर्यंत आरोग्यविषयक पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 43 हजार 31 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 274 प्रवासी आले आहेत. पैकी 163 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 74 जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी 71 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. आजवर भरती झालेल्या 74 प्रवाशांपैकी 70 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी 2 जण मुंबई व पुणे येथे भरती आहेत.
दरम्यान, चीनमधील 645 भारतीयांना वुहान शहरामधून एअर इंडीयाच्या विमानाने आणण्यात आले होते. हे सर्व भारतीय नागरिक आय टी बी पी नवी दिल्ली आणि आर्मी कॅम्प, मानेसर येथे 14 दिवसांकरता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या प्रयोगशाळा चाचण्या कोरोना आजारासाठी निगेटिव्ह आल्या आहेत. आपला विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता हे प्रवासी आपापल्या मूळ गावी परतत आहेत. आज आणखी 5 जण राज्यात परतले आहेत. खबरदारी म्हणून या प्रवाशांचा पुढील 14 दिवसां करिता पाठपुरावा करण्याच्या सूचना सर्व संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत.