Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्मार्टकार्ड तयार करण्याबाबत निविदा मागविण्यात आलेल्या नाहीत – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई : “वन नेशन वन रेशन कार्ड” योजनेच्या अनुषंगाने भविष्यात नव्याने शिधापत्रिका तयार करावयाची झाल्यास, त्याबाबतचा नमुना केंद्र शासनाने पाठविला आहे. परंतू सद्य:स्थितीत प्रचलित असलेल्या शिधापत्रिकांवरील माहिती परिपूर्ण स्वरुपाची असून या शिधापत्रिकांद्वारे आंतरराज्य पोर्टेबिलीटीची सुविधा उपलब्ध होऊ शकते व त्यासाठी सद्य:स्थितीत नव्याने स्मार्ट कार्ड तयार करुन वितरीत करावयाची आवश्यता नाही, असे केंद्र शासनाने कळविले आहे.

या प्रकरणी नवीन स्मार्ट कार्ड तयार करण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या असल्याबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत असे स्पष्ट करण्यात येते की, अशाप्रकारे नवीन स्मार्ट कार्ड  तयार करण्याबाबत निविदा मागविण्याबाबतची किंवा तत्सम कोणतीही कार्यवाही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत तसेच क्षेत्रीय स्‍तरावर करण्यात आलेली नाही.  जनतेने अशा कोणत्याही जाहिरात अथवा विविध प्रसार माध्यमांद्वारे दिशाभुल करणारी प्रकाशने/जाहिराती/बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे.  अशाप्रकारे उक्त योजनेसंदर्भात कुठलीही जाहिरात अथवा दिशाभूल करणारी कागदपत्रे निदर्शनास आल्यास उपरोक्त कागदपत्रांसह अवर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर संपर्क साधावा, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

Exit mobile version